11 June, 2007

दुःखाच्या वाटेवर...

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

2 comments:

Sumant Sutar said...

Rahul tuza blog khup sundar aahe...
marathi sahityachya premapoti ghetalelya kastasathi....tuze manapasun abhinandan.......

sumant.

gazalpremi said...

तुमचा ब्लॉग मला फार आवडतो. तुमच्या ब्लॉगची लिंक माझ्या http://gazalpremi.blogspot.com/ या ब्लॉगवर दिली आहे. आपण माझ्या ब्लॉगची लिंक या ब्लॉगवर द्यावी अशी विनंती करतो.