11 March, 2011

मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते;
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही;
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!

09 March, 2011

रंगुनी रंगात सार्‍या

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा !!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे !
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी !
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो !
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !!

सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा !
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !!

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी !
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !!

11 June, 2007

दुःखाच्या वाटेवर...

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

07 May, 2007

आसवांनी मी मला भिजवु कशाला?

आसवांनी मी मला भिजवु कशाला?
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?

लागले वणवे इथे दाही दिशांना?
एक माझी आग मी उजवु कशाला?

मी उन्हाचा सोबती घामेजलेला?
चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?

रात्र वैर्‍याची पहारा सक्त माझा?
जागणारे शब्द मी निजवु कशाला?

27 April, 2007

पांगळा प्रवास

राहिले रे अजून श्वास किती
जीवना,ही तुझी मिजास किती

आजची राञ खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती

मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती

दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?

ओळखीचे कुणीतरी गेले..
ओळखीचा इथे सुवास किती

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

सोबतीला जरी तुझी छाया..
मी करू पांगळा प्रवास किती

विसरुन जा!

विसरुन जा! विसरुन जा! तुजलाच तू विसरुन जा!
तुझियाच आयुष्याचिया हाकांसवे हरवून जा!

आता न ती स्वप्ने तुझी, आता न ती गीते तुझी;
तुटली तुझी लय शेवटी : तूही असाच तुटून जा!

येथे तुझी चाहुलही तुजपासुनी पळ काढते -
दुरस्थ जो आहेस तू त्याच्याकडे परतून जा!

ह्या बंद दारांना कधी येईल का करुणा तुझी?
ओसाड ह्या गावांतुनी आता निमूट निघून जा!

जे भाग्यवंताना मिळे ते दुःख तुजला लाभले;
रडणे तुझे सांगु नको; हसणे तुझे उधळून जा!

अद्यापही पदरात का जपशी अशी तारांगणे?
उल्केपरी जगलास तू उल्केपरी निखळून जा!

वणवा तुझ्या ह्रद्यातला लपवून ठेव असाच तू...
जर पेटलास चुकूनि तू तर आसवात बुडून जा!

आजन्म वैऱ्यासारखे ज्याने तुला वेडावले
तो चेहरा होता तुझा त्यालाच वेडावून जा!

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे