27 April, 2007

पांगळा प्रवास

राहिले रे अजून श्वास किती
जीवना,ही तुझी मिजास किती

आजची राञ खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती

मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती

दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?

ओळखीचे कुणीतरी गेले..
ओळखीचा इथे सुवास किती

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

सोबतीला जरी तुझी छाया..
मी करू पांगळा प्रवास किती

विसरुन जा!

विसरुन जा! विसरुन जा! तुजलाच तू विसरुन जा!
तुझियाच आयुष्याचिया हाकांसवे हरवून जा!

आता न ती स्वप्ने तुझी, आता न ती गीते तुझी;
तुटली तुझी लय शेवटी : तूही असाच तुटून जा!

येथे तुझी चाहुलही तुजपासुनी पळ काढते -
दुरस्थ जो आहेस तू त्याच्याकडे परतून जा!

ह्या बंद दारांना कधी येईल का करुणा तुझी?
ओसाड ह्या गावांतुनी आता निमूट निघून जा!

जे भाग्यवंताना मिळे ते दुःख तुजला लाभले;
रडणे तुझे सांगु नको; हसणे तुझे उधळून जा!

अद्यापही पदरात का जपशी अशी तारांगणे?
उल्केपरी जगलास तू उल्केपरी निखळून जा!

वणवा तुझ्या ह्रद्यातला लपवून ठेव असाच तू...
जर पेटलास चुकूनि तू तर आसवात बुडून जा!

आजन्म वैऱ्यासारखे ज्याने तुला वेडावले
तो चेहरा होता तुझा त्यालाच वेडावून जा!

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

नेहमीच

नेहमीच करितो मी
तुजला नयनात बंद
नेहमीच अश्रूंतुन
पळण्याचा तुजसी छंद!

जेव्हा होऊन मस्त
गातो मी मैफलीत
नेहमीच तेव्हां नभ
झुलते एका कळीत!

नेहमीच घेतो मी
तुजला माझ्या मिठीत
निरखिताच दिसते पण
मजला माझेच गीत

नेहमीच मज माझ्या
दुःखाचा कैफ चढे!
नेहमीच माझे सुख
माझ्या दुःखात दडे!

नेहमीच म्हणतो मी
"दुःख दे मला अजून!
हे कसले दुःख दिले
जे आले सुख बनून!"

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दुर दुर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तु घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तु नाहशील,
दर्पनात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा राञी कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गाञांतून गुणगुणेल!

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

तुझी जाणवे सोबत

चार चौघात राहून
मला लाभतो एकांत
अशा एकांतामध्येही
तुझी जाणवे सोबत

मी ही हांसुन बोलत
तुला लपवितो पण
'आंत' चालले असते
तुझ्यासह संभाषण!

तुझी कुठेही, कधीही
मला लागते चाहूल
मग भांबावे पाहून
माझा चेहरा मलूम!

माझ्या काळजाला लागे
तुझ्या लावण्याची झळ,
पहा! फिरून उठली
तुझ्या सान्निध्याची कळ

17 April, 2007

एक साधा प्रश्न माझा

एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे!
हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे?

कारणावाचून माझा शोध घेती कारणे
अन् कुणा ठाणे मला मी विस्मरे किंवा स्मरे?

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी;
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?

जाळुनी आयुष्य माझे वाट मी तेजाळली;
फक्त माझे पोट आता जाळण्यासाठी उरे!

दूर आलो एवढा की थांबल्या मागे दिशा...
माझियासंगे उद्याची चालती संवत्सरे!

ह्याच आता शेष माझ्या राहिल्या काही खुणा :
दोन माझी आसवे अन् चार माझी अक्षरे!

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यात वाहणाऱ्या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये,अता रडाया मजला उसंत नाही

दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

गंजल्या ओठास माझ्या

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यास माझ्या सुर्य सत्याचा जळु दे!

पांगळा बंधिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गाञी खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे!

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे!

हे गीत आपुले मी का मैफलीत गाऊ?

साऱ्याच यातनांना का एकलाच साहू?
सोशीत घाव सारे का मी असाच राहू?

तू सांगशी हसाया, हासेन मी परंतु
तू सांग आसवे ही कोठे जपून ठेवू?

ऐकून शब्द माझे तू लाजशी परंतु
तु सांग,लाजणे हे डोळे भरून पाहू?

पाहूनही तुला गे पाहू तरी किती मी?
या रूपसागराला नेञी कसा समावू?

चर्चा जगात चाले,"काही न यास झाले!"
माझी व्यथा इमानी,कोणी रडे दिखाऊ!

रे अमृता तुझा मी झालो तरंग झालो
ओझे तुझ्या व्यथेचे आता कशास वाहू?

माझे तुझे निराळे काही जगात नाही!

वळण

मी असाच जगतांना जळणारच!
सरणावर श्रेय मला मिळणारच!

तुमचा हा राग व्यर्थ! उबग व्यर्थ!
मी इथून आजउद्या टळणारच!

जन्माची वाट किती पाहू मी?
माथ्यावर चंद्र काय ढळणारच?

कां माझे मोहरते अंग अंग?
तुज माझे अंतरंग कळणारच!

आता मज दुःखाचे नाही भय...
माझे ह्या जखमांशी जुळणारच!

जोवर मज छळवादी प्राण छळे,
मीही मज श्वासांनी छळणारच!

प्रेमाच्या गावाचा हा प्रवास...
मी माझ्या वळणावर वळणारच!

आता असे करु या!

नाही म्हणायला आता असे करु या
प्राणात चंद्र ठेवू-हाती उन्हे धरु या

आता परस्परांची चाहूल घेत राहू
आता परस्परांच्या स्वप्नात वावरु या

नेले जरी घराला वाहुन पावसाने
डोळ्यातल्या घनांना हासून आवरु या

गेला जरी फुलांचा हंगाम दुरदेशी
आयुष्य राहिलेले जाळुन मोहरु या

ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे...
माझ्यातुझ्या मिठीने ही राञ मंतरु या

हे स्पर्श रेशमी अन् हे श्वास रेशमाचे...
ये! आज रेशमाने रेशीम कातरु या

सुगंध

जे नको तेच मी करत गेलो!
मी तुझ्या अंतरी शिरत गेलो!

काय कोणी कधी प्रेम केले?
वेदनेलाच मी वरत गेलो!

ते शहाणे सुखी लोक होते!
मीच वेडापिसा ठरत गेलो!

लाख नकार तू शब्द माझे!
मी तुझ्याही मनी जिरत गेलो!

जन्म कोड्यापरी काढला मी!
संपताच मी उरत गेलो!

डोळियांनी मला 'बंद' केले...
लेखणीतून मी झरत गेलो!


ते तुझे धोरणी दार होते...
मी जसाच्या तसा परत गेलो!

सोबतीचा कुठे प्रश्न होता?
हात माझा मी धरत गेलो!

हात होते जरी बांधलेले,
मी सुगंधापरी फिरत गेलो!

मी रोज रोज रस्ते बदलायचे किती?

फसवून मी स्वतःला फसवायचे किती?
नुसतेच सावल्यांना बिलगायचे किती?

जे बोललो तुझ्याशी ते सांग नेमके
मी शब्द ऐनवेळी विसरायचे किती?

तुजला कधी न आला माझा सुगंधही...
वैराण एकटे मी उमलायचे किती?

मज तुच सांग माझ्या थकल्या वयातही-
"वय मी खुळ्या मनाचे लपवायचे किती?"

अजुनी कशी तरुंना फुटली न पालवी?
धरतीवरी नभाने बरसायचे किती?

दिसती जिथे तिथे ही जखमीच माणसे;
मी माझियाचसाठी विव्हळायचे किती?

शोधू कुठे कुठे मी स्वप्ने अजूनही?
मी श्वास राहिलेले उधळायचे किती?

मी कोणत्या अभागी देशात जन्मलो?
प्रेतास येथल्या मी उठवायचे किती?

दुनियाच ही अशी अन् उपदेश हे असे...
मी अंतरास माझ्या विझवायचे किती?


मागे कधीच माझे आयुष्य संपले
अवशेष आपुले मी सजवायचे किती?

अद्यापही न माझा मज गाव भेटला...
मी रोज रोज रस्ते बदलायचे किती?

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो..कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करु तरी काय? हाय, तेव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दुःख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडुन माझेच प्रेत होते!

मला विचारु नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल राञी उसासणाऱ्या हवेत होते!

सुर्य येणारे मला कवळून गेले

कोण जाणे कोण हे जवळून गेले!
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!!

जिंकला होता जरी मी डाव तेव्हा!
दान जे पडले मला उधळून गेले!!

भेटण्यासाठी कुणी आलेच नाही!
लोक आलेले मला चघळून गेले!!

हे खरे की मी जरा चुकलोच तेव्हा!
लोकही वाटेल ते बरळून गेले!!

लागली चाहूल एकांती कुणाची!
कोण माझ्या लोचनी तरळून गेले!!

काय माझ्या मालकीचे अर्थ होते!
शब्द माझे भाबडे हुरळून गेले!!

या दुपारी मी कुणाला हाक मारु!
ओळखीचे चेहरे वितळून गेले!!

कोणता कैदी इथे कैदेत आहे!
रंग भिंतींचे कसे उजळून गेले!!

पाठमोरा मी जरी झालो,तरीही!
सुर्य येणारे मला कवळून गेले!!

स्मरण

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी!
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी!!

वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही!
गांजणाऱ्या वासणांची बंधने सारी तुटावी!!

संपली माझी प्रतिक्षा गोठली माझी अपेक्षा!
कापलेले पंख माझे लोचने आता मिटावी!!

सोबती काही जिवाचे माञ यावे न्यावयाला!
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी!!

दूर राणातील माझी पाहुनी साधी समाधी!
आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओघळावी!!

कोण मी आहे मला ठाऊक नाही नाव माझे!
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी!!

हे रिते अस्तित्व माझे शोध शून्यातील वेडा!
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी!!

काय सांगावे तुला मी काय मी बोलू तुझ्याशी!
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी!!

बरे नाही

हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा!
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!!

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी!
आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!!

आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ!
जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!!

कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता!
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!!

मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली!
हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!!

गाञागाञाला फुटल्या

गाञागाञाला फुटल्या
तुज्या लावण्याच्या कळ्या!
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षञे खुडती!
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!!

आसवांचे जरी हसे झाले

आसवांचे जरी हसे झाले!
हे तुला पाहिजे तसे झाले!!

चंद्र आला निघुनही गेला!
ऐनवेळी असे कसे झाले!!

शोधुनी मी तुला कुठे शोधु!
चेहऱ्याचेच आरसे झाले!!

पाहिले दुःख मी तुझे जेव्हा!
दुःख माझे लहानसे झाले!!

आग ओकून मी किती ओकू!
शब्द सारेच कोळसे झाले!!

संपले हाय बोलणे माझे!
जे तुझ्याशी कसेबसे झाले!!

मेल्यावरी जगाचे आभार मानले मी

मेल्यावरी जगाचे आभार मानले मी!
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी!!

तेव्हा जरी जरासा होतो.. जिवंत होतो!
सारेच श्वास खोटे उपचार मानले मी!!

केव्हाच सांत्वनाची केली न मी अपेक्षा!
अपुल्याच आसवांना नादार मानले मी!!

होत्या सुन्या घराच्या भिंती विवंचनांच्या!
बाहेरच्या बिळांना शेजार मानले मी!!

माझ्याच बोलण्याशी आजन्म बोललो मी!
विजनातल्या हवेला संसार मानले मी!!

आयुष्य संपतना इतकीच खंत होती!
काही भिकारड्याना दिलदार मानले मी!!

माझ्या पराभवाची समजूत घातली मी!
जे वार खोल गेले, ते यार मानले मी!!

प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो!
प्रत्येक तोतयाला अवतार मानले मी!!

सुर मागू तुला मी कसा

सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
दुःख माझा तुझा आरसा

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
खेळलो खेळ झाला जसा

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
मी तरिही जसाच्या तसा

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा

काय मागून काही मिळे?
का तुला बीत माझे कळे?
व्यर्थ हा अमृताचा वसा

समजावुनी व्यथेला समजावता न आले

समजावुनी व्यथेला समजावता न आले!
मज दोन आसवांना हुलकावता न आले!!

सर एक श्रावणाची आली निघुन गेली!
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले!!

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा!
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!!

चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा!
देणे मलाच माझे नाकारता न आले!!

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही!
ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले!!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे!
जगणे अखरे माझे मज टाळता न आला!!

वणवण

रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो!

सांत्वनांना तरी ह्रदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो!

ऎकणारे तेथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो!

शेवटी राहिले घ्रर सुनेच्या सुने...
उंब-यावरच मी तणतणत राहिलो!

ऎनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!

मज न ताराच तो गवसला नेमका..
अंबरापार मी वणवणत राहिलो!

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बॅसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

15 April, 2007

सुगंध

जे नको तेच मी करत गेलो!
मी तुझ्या अंतरी शिरत गेलो!

काय कोणी कधी प्रेम केले?
वेदनेलाच मी वरत गेलो!

ते शहाणे सुखी लोक होते!
मीच वेडापिसा ठरत गेलो!

लाख नकार तू शब्द माझे!
मी तुझ्याही मनी जिरत गेलो!

जन्म कोड्यापरी काढला मी!
संपताच मी उरत गेलो!

डोळियांनी मला 'बंद' केले...
लेखणीतून मी झरत गेलो!


ते तुझे धोरणी दार होते...
मी जसाच्या तसा परत गेलो!

सोबतीचा कुठे प्रश्न होता?
हात माझा मी धरत गेलो!

हात होते जरी बांधलेले,
मी सुगंधापरी फिरत गेलो!

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
आताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!

बोललो होतो कधी मी

'बोललो होतो कधी मी, ऐक ही माझी कहाणी
का तुझ्या डोळ्यात आले, कारणा वाचून पाणी...'

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची...

नाव हे त्या तुझ्या दिवाण्याचे
काळजी घे जरा उखाण्याची...

राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची...

लोक आले... आताच का आले ?
वेळ झाली निघून जाण्याची...

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची....

02 April, 2007

भोगले जे दुःख त्याला

भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!

ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले!

लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले!

गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले!

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !

जगत मी आलो असा की

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

तेंव्हा

तू नभातले तारे माळलेस का तेंव्हा?
माझीयाचं स्वप्नांना गाळलेस का तेंव्हा?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेंव्हा?

हे तुझे मला आता पाहणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेंव्हा?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?

कीती क्षण राहीले

आता जगायाचे असे माझे कीती क्षण राहीले
माझ्या धुळीचे शेवटी येथे कीती क्षण राहीले?

ह्रदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका
नाही म्हणाया कुठे ते आपलेपण राहीले

होता न साधा येवढा जो शब्द मी तुजला दिला
एका शब्दाला उभे आयुष्य तारण राहीले

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो मागे कीती जण राहीले

पायपीट

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लाग्ले
थबकले न पाय तरी ह्दय मात्र थाम्बले
वेशिपशि उदास हाक तुझि ऐकलि
अन् माझि पायपीट डोळ्यातून सान्डलि

मग् माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन् माझि हाक तुझ्या अन्तरात हुर्हुरेल

सहज कधि घरात लावशील तू सान्जवात
अन् माझे मन तिथे ज्योतिसह थरथरेल्

मग सुटेल मन्द मन्द वसन्तिक पवन धुन्द
माझे आयुष्य तुझ्या अन्गणात टप्टपेल

हा असा चंद्र

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,
राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले
दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुथे आत शिरायासाठी !

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी

एकदा मीही तुझा कापूर होतो

मी असा त्या बासरीचा सूर होतो!
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो!

प्रीतही आली फुलांच्या पावलांनी
हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो!

राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता...
मी घरोब्याचे जुने काहूर होतो!

तू किती केलास भेटीचा अचंबा..
भूतकाळाचा जणू मी धूर होतो!

मी न साधी चौकशी केली घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो!

कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो!

तेवते आहेस तू पूजेत कोठे?
एकदा मीही तुझा कापूर होतो!

तरुण आहे रात्र अजूनि

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे

उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे

ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

मेंदीच्या पानावर

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं
जाईच्या पाकळया दवं अजून सलते गं

झूळझूळतो अंगणात तोच गार वारा
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा

अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
अजून तुझ्या डोळयातील मोठेपण कवळे गं

मालवून टाक दीप

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग

दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग

गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग

मलमली तारुण्य माझे

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे

चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात

मनातल्या मनात मी

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.

असेच रोज नाहुनी लपेट ऊन कोवळॆ.....
असेच चिंब केस तु ऊन्हात सोड मोकळॆ.
तुझा सुगंध मात्र मी इथेच हळुच हुंगतो.

अशी लवून अंगणी..लवून वेच तु फुले.
असेच सांग लाजुनी कळ्यास गुज आपले.
तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपुन काढतो.

अजुन अजाण हा कुवार कर्दळी परी.
गडे विचार एकदा जुईस एकदा तरी.
"दुरुन कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो.

तसा न राहिला आता उदास एकटॆपणा
तुझी रुपपल्लवी जिथेतिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सळाळतो.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

आज गोकुळात रंग

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी

सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी

आली तुझी निमित्ते

येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे

दे जीवना मला तू आता नवी निराशा
हे दुःख नेहमीचे झाले जुनेपुराणे!

तेव्हा मला फ़ुलांचा कोठे निरोप आला?
माझे वसंत होते सारे उदासवाणे

सांगू नकोस की, मी तेव्हा जिवंत होतो
तेव्हा जिवंत होते माझे मरुन जाणे

साधीसुधी न होती माझी स्मशानयात्रा..
आली तुझी निमित्ते! आले तुझे बहाणे

मरणाने केली सुटका

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सांग ना?

फक्त एकदा माझ्या समोरून पुढं जाऊन
मग चोरुन मागं पाहशील का गं कधी?

माझ्या डोळ्यांतून तुझं रूप
पहात बसशील का गं कधी?

तू येण्या जाण्याचे रस्ते वेचणारं माझं मन
वाचशील का गं कधी?

दिसली नाहीस कधी तर होणाऱ्या वेदना
माझ्याबरोबर सोसशील का गं कधी?

सांग ना? तू समोर आल्यावर मी शब्द हुडकताना
अव्यक्तातून माझ्यापाधी व्यक्त होशील का गं कधी?

कळते मज सारे कळते रे

कळते मज सारे कळते रे
मन माझे तरीही चळते रे

राखत आले सखया अजवर
विचारले नसण्याचे अंतर
शब्द तुला भेटतील नंअत्र
आयुष्य न मागे वळते रे

कळते मज तू अवख़ळ वारा
कळते मज तू रिमझिम धारा
कधी दुरचा पहाटवारा
तव रूप कसेही छळते रे

कळते रे हे तुझेच अंगण
जिथे फुलांची नाजूक पखरण
थकले रे, आले तरीही पण
का दार तुझे अडखळते रे

केव्हातरी पहाटे

केव्हातरी पहाटे उलटून राञ गेली
मिटले चुकून डोळे हरवून राञ गेली

कळ्ले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळ्ले मला न केव्हा निसटून राञ गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून राञ गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून राञ गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून राञ गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून राञ गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन राञ गेली?

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

लाभले आम्हास भाग्य

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफूलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या गनागनात गर्जते मराठी

येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभातून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी