17 April, 2007

एक साधा प्रश्न माझा

एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे!
हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे?

कारणावाचून माझा शोध घेती कारणे
अन् कुणा ठाणे मला मी विस्मरे किंवा स्मरे?

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी;
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?

जाळुनी आयुष्य माझे वाट मी तेजाळली;
फक्त माझे पोट आता जाळण्यासाठी उरे!

दूर आलो एवढा की थांबल्या मागे दिशा...
माझियासंगे उद्याची चालती संवत्सरे!

ह्याच आता शेष माझ्या राहिल्या काही खुणा :
दोन माझी आसवे अन् चार माझी अक्षरे!

1 comment:

चित्तरंजन भट said...

प्रिय राहुल पाटील,

नमस्कार. तुम्ही कविवर्य सुरेश भट यांच्या कविता इथे प्रकाशित केल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. भटांच्या नावाने नुकतेच www.sureshbhat.in हे संकेतस्थळ सुरू झाले आहे. अवश्य यावे.

आपला,
चित्तरंजन भट